मित्रांनो,
इंटरनेटवर ब्लॉग लिहावा अशी खूप इच्छा आहे, मात्र ते आपल्याला जमेल का? अशी मोठी अनामिक भीती सतत मनात होती. परंतु आज ब्लॉगचे पान सहज उघडले, तर काय? दिनांक १५ जुलै २००९ रोजी,चक्क इंग्रजीतून मी लिहिलेला ब्लॉग माझ्या पुढयात उघडला. माझा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याचे कारण मी ब्लॉग लिहिलेला आहे हे मी पूर्णपणे विसरलो होतो. असो…सध्या अस्तित्वातील ब्लॉगमुळे मनातील भीती दूर होण्यास मदत झाली.
राज्य सरकारी कर्मचारी व अधिकारी यांची चळवळ हा या ब्लॉगचा एक महत्त्वाचा भाग राहील. तरीही आजूबाजूला घडणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक बाबींवर देखील चर्चा या माध्यमातून करता येईल.
सध्या आपल्या देशात सुसंस्कृतपणा बहुधा आपण वेशीवर टांगला की काय अशी शंका येते? त्याचे कारण, ज्यांनी देशाच्या संस्कृती व परंपरा यांचे संवर्धन व प्रसार करावा अशा लोकांकडूनच आमच्या संस्कृतीची लक्तर काढली जात आहेत ही मोठीच दुर्दैवी बाब आहे. गुन्हे घडणे ही समाजात नवीन व विशेष अशी गोष्ट नाही. परंतु त्या गुन्ह्यांना आळा घालण्याऐवजी गुन्हेगारांना जर समाजातील एक मोठा वर्ग या ना त्या कारणाने पाठीशी घालत असेल तर मग ती चिंतेची बाब ठरते. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेला आपण स्वायत्तपणे काम करू दिले नाही तर त्याच्याकडून काय अपेक्षा करणार ? कालच राज्याच्या एका निवृत्त पोलिस महासंचालकांनी या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . प्रत्येक लहानसहान गोष्टीत आपणच यंत्रणावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाब आणतो एव्हढेच नव्हे तर मी नियम किंवा कायदा यापेक्षा किती मोठा आहे याची खोटी फुशारकी मारण्यात मोठेपणा समजतो आणि मग सुरु होते आपल्या संस्कृती व परंपरा यांची घसरण. ही घसरण कुठे नेईल हे सांगता येणार नाही. मात्र त्यामुळे काही पिढयांचे आपण नुकसान करीत आहोत एवढे मात्र निश्चित. काय करता येऊ शकते आपल्याला ? खूप काही....फ़क्त गरज आहे एका निर्धाराची. निर्धार मदतीचा, निर्धार सामाजिक जाणीवेचा निर्धार कर्तव्याचा!